May 8, 2026
Screenshot_2026-05-08-08-01-29-37_92460851df6f172a4592fca41cc2d2e6

 

Farm Road Dispute|| सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील साडे गावातील शेतकरी हनुमंत मच्छिंद्र गोमे यांच्या वहीवाटीच्या रस्त्याच्या वादाला अखेर प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. युवक लिंगेश्वर गोमे यांनी सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या व्हिडीओनंतर तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी ६ मे २०२६ रोजी महत्त्वपूर्ण आदेश देत संबंधित प्रतिवादींना रस्त्यात कोणताही अडथळा निर्माण न करण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेमुळे गावात मोठी चर्चा सुरू झाली असून प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

 

साडे गावातील हनुमंत गोमे यांनी त्यांच्या भावकीतील काही व्यक्तींविरोधात मामलेदार कोर्ट अॅक्ट १९०६ च्या कलम ५ अंतर्गत अर्ज दाखल केला होता. उताऱ्यावर नोंद असलेला वहीवाटीचा रस्ता संबंधितांकडून अडवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या रस्त्यामुळेच त्यांच्या शेतात जाण्याचा मार्ग होता. मात्र रस्ता बंद झाल्याने त्यांची द्राक्षबाग उद्ध्वस्त झाली आणि शेती दोन ते तीन वर्षे पडीक राहिल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

Farm Road Dispute | आत्मदहनाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाची तातडीने दखल

या प्रकरणाला वेगळे वळण तेव्हा मिळाले, जेव्हा लिंगेश्वर गोमे यांनी रस्ता अडवल्यामुळे महिलेकडून मारहाण होत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. या व्हिडीओमध्ये त्यांनी आत्मदहन करण्याचा इशाराही दिला होता. व्हिडीओ व्हायरल होताच पत्रकार आणि सामाजिक स्तरावर हा मुद्दा चर्चेत आला. त्यानंतर अवघ्या २४ तासांत प्रशासनाने हालचाल करत रस्ता खुला ठेवण्याचा आदेश दिला.

तहसीलदारांनी क्र. जमा-२/कलम५/एसआर/६१/२०२५ अन्वये दिलेल्या आदेशात स्पष्ट नमूद केले की, “स्थळ पाहणीमध्ये खुल्या असलेल्या रस्त्याने वादी यांना ये-जा करण्यासाठी प्रतिवादींनी कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करू नये.” हा आदेश ग्राम महसूल अधिकारी, साडे यांच्याकडे अंमलबजावणीसाठी पाठवण्यात आला आहे.

 

Farm Road Dispute | “रस्ता खुला असल्याचा पंचनामा करून प्रशासनाची दिशाभूल”

मात्र या आदेशानंतरही हनुमंत गोमे यांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, तहसीलदारांकडे अर्ज देऊन एक वर्ष उलटून गेले, तरी स्थळ पाहणीसाठी तारीख दिली जात नव्हती. आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतरच प्रशासन हलले आणि पाहणीची तारीख मिळाली.

 

त्यांच्या मते, स्थळ पाहणीच्या दिवशी संबंधितांनी काटाड्या हटवून तात्पुरता रस्ता खुला केला आणि प्रशासनाची दिशाभूल करत रस्ता खुला असल्याचा पंचनामा करण्यात आला. गावातील कोतवाल, तलाठी आणि महसूल अधिकारी यांना प्रत्यक्षात रस्ता अडवलेला असल्याची माहिती होती, तसेच रस्ता बंद असल्यामुळे द्राक्षबागेचे मोठे नुकसान झाले हेही त्यांना माहिती होते, असा आरोप त्यांनी केला.

 

Farm Road Dispute | “१२ फुटांचा रस्ता अतिक्रमण करून ५ फुटांवर आणला”

हनुमंत गोमे यांनी आणखी एक गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. सातबारावर नोंद असलेला १२ फुटांचा रस्ता अतिक्रमण करून अवघा ५ फुटांवर आणण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. हा रस्ता कायमस्वरूपी अतिक्रमणमुक्त करून मूळ रुंदीने खुला करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे

त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी आणि कोतवाल यांनी स्वतः उपस्थित राहून रस्ता अतिक्रमणमुक्त करून दिला नाही, तर कर्जबाजारीपणा आणि प्रशासनाकडून झालेल्या अन्यायामुळे आठ दिवसांत संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करण्याचा निर्णय कायम राहील. या संदर्भात ते प्रशासनाला पुन्हा निवेदन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

Farm Road Dispute | “स्थळ पाहणीसाठी एक वर्ष का लागले?”; प्रशासनावर प्रश्नचिन्ह

या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न म्हणजे स्थळ पाहणीसाठी तब्बल एक वर्षाचा कालावधी का लागला, हा आहे. हनुमंत गोमे यांच्या मते, वहीवाटीचा रस्ता अडवल्याच्या प्रकरणात अर्ज दाखल झाल्यानंतर तीन महिन्यांत स्थळ पाहणी आणि निकाल अपेक्षित होता. मात्र प्रशासनाच्या विलंबामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

 

द्राक्षबाग उद्ध्वस्त झाल्यामुळे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला असून या नुकसानीची भरपाई कोण देणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

 

Farm Road Dispute | शेतकऱ्याची प्रशासनाकडे अंतिम मागणी

व्हायरल व्हिडीओनंतर प्रशासनाने आदेश दिले असले तरी शेतकरी हनुमंत गोमे यांची मागणी अजूनही कायम आहे. सातबारावरील १० फुटांचा रस्ता अधिकृत मोजणी करून कायमस्वरूपी खुला करण्यात यावा, तसेच द्राक्षबागेच्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी त्यांची भूमिका आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *