गुन्ह्यांच्या बाबतीत नागरिकांनी सहकार्य करण्याचे पोलिसांचे आवाहन
करमाळा, विशाल परदेशी – आज सकाळी शुक्रवारच्या आठवडी बाजारात भोसे येथील ऋषिकेश रवींद्र अडसूळ या युवकाच्या पाठीत चाकू खुपसून अज्ञात हल्लेखोर पळून गेला होता. हल्लेखोरा बाबत जखमी ऋषिकेशलाही काहीच कल्पना आली नाही. मात्र या हल्ल्याची माहिती मिळताच करमाळा पोलिसांनी या हल्लेखोरास केवळ अर्ध्या तासात शोधले आहे.
आज (शुक्रवारी) सकाळी दहा वाजता शहरातील सोन्याचे व्यापारी रवि सोनी हे नेहमीप्रमाणे भाजीपाला खरेदीसाठी दुकानातील कामगार ऋषिकेश याला सोबत घेऊन गेले होते. दरम्यान हे दोघेही करमाळा शहरातील पेट्रोल पंपा समोरील जगदंबा हॉटेल समोर आले असताना एकाने अचानकपणे ऋषिकेशवर पाठीमागून चाकू हल्ला केला व तो पळून गेला. यावेळी ऋषिकेशच्या उजव्या खांद्यात चाकू रुतून बसल्याने रवी सोनी यांनी त्याला ताबडतोब करमाळा उपजिल्हा रुग्णालयात नेले. दरम्यान भर गर्दीत हा प्रकार घडल्याने आठवडी बाजारात एकच खळबळ उडाली आणि शहरभरासह करमाळा पोलिसांनाही या घटनेची माहिती मिळाली.
ही माहिती मिळतच करमाळा पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी पो.हे.कॉ. अजित उबाळे, पो. ह. जोतिराम बाळसराफ आणि पो.ह. बापूसाहेब कोकाटे यांना आरोपीच्या शोधार्थ पाठवले. पेट्रोल पंप परिसरातील सीसीटीव्ही च्या माध्यमातून या तिघांनी सदर आरोपीला ओळखून अवघ्या अर्ध्या तासात त्याला ताब्यात घेतले.
हल्लेखोराला ताब्यात घेतल्यानंतर त्याची ओळख विचारली असता तो करमाळा शहरातील खडकपुरा गल्ली येथील ओंकार प्रकाश कांबळे (वय-२१) हा असल्याचे निदर्शनास आले. अधिक माहिती घेतली असता तो सोनी यांच्या दुकानातच कामाला असल्याचे तसेच कामात नियमितता नसल्याने सोनी यांनी त्याला कामावरून काढून टाकले असल्याचे कळले. कामावरून काढून टाकलेल्या रागातूनच ओंकार ने हे कृत्य केल्याचे मान्य केले असून करमाळा पोलिसांत त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याचे काम शुक्रवारी सायंकाळी सुरू होते.
दरम्यान हल्लेखोर ओंकारला पकडून पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्याच्या आईने ओंकार हा मनोरुग्ण असल्याचे तसेच त्याच्यावर अहिल्यानगर येथील मानसोपचार व व्यसनमुक्ती केंद्रात उपचार सुरू असल्याचे सांगितले आहे.
भर बाजारात आणि भर गर्दीत चाकू हल्ल्याचा प्रकार घडल्यानंतर करमाळा पोलीस घटनास्थळी जाऊन चौकशी करत असताना घटनास्थळावरील दुकानदार तसेच बाजारात भाजीपाला, कपडे आदी वस्तूंची दुकाने लावलेल्या व्यापाऱ्यांकडे हल्लेखोरा बाबत माहिती विचारली असता या व्यावसायिकांनी पोलिसांना माहिती देण्याचे टाळले. गुन्ह्याच्या घटनांमध्ये नागरिकांनी शोधकार्यात मदत करणे अपेक्षित आहे, माहिती देणाऱ्या व्यक्तींना पोलिसांकडून कोणताही त्रास अथवा कोणत्याही कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागत नाही. त्यामुळे नागरिकांनी विविध गुन्ह्यांबाबतची स्वतःकडील माहिती कोणतीही भीती न बाळगता पोलिसांना देऊन सहकार्य करावे.
-रणजीत माने,
पोलीस निरीक्षक, करमाळा.